Parola Visit

धरती फौंडेशन ची प्रत्येक ट्रिप काहीतरी शिकवून जाते..हा अनुभव काल ही आला. आपल्या कडे पारोळा गावातील 2 मुले आहेत,त्यांना आधी फक्त एकदा डॉ अनिल पवारांनी भेट दिली होती,मी स्वतः अजून तिथे पोहोचले नव्हते. त्यामुळे एकदा तरी तेथे जाणे गरजेचे होते .खरं तर धरती फौंडेशन चे काम सध्या तरी नाशिक जिल्ह्यापर्यंत सीमित आहे ,पण आपली ही मुले जळगाव जिल्ह्यातील आहेत , मुळात ही मुले मालेगाव मधील होती पण या दोन्ही मुलांचे आई आणि वडील यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना त्यांचे काका किंवा इतर कुणी सांभाळण्यास तयार नव्हते .म्हणून ते आता त्यांच्या आजोळी आज्जीकडे राहतात .आज्जीलाही या मुलांची आई ही एकुलती एक मुलगी होती आणि ती पण या जगात नाही ,त्यामुळे ती माउली पण एकटी या नातवंडांना सांभाळते. सकाळी साडेसात वाजता ड्राइवर कृष्णा ला घेऊन मी पारोळ्याच्या दिशेने निघाले . बोरकुंड येथे एका मुलीला भेट द्यायची होती म्हणून मुख्य हाय वे ने न जाता आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो त्यामुळे तो रस्ता जरा त्रासदायक होता आणि जास्त वेळ लागला .गाडी जास्त आदळल्यामुळे मला उलटी देखील झाली . साधारण साडेअकरा वाजता पारोळ्याला रंजनाबाई पाटील यांच्या घरी पोहोचलो .मला पाहून ती माउली खूप खुश झाली .तिला ही मला भेटण्याची खूप इच्छा होती. काय करू आणि काय नको असे तिला झाले .जेवण्याचाही खूप आग्रह केला पण अजून मालेगाव च्या मुलांनाही भेट द्यायची होती म्हणून फक्त चहा वरच आटोपले . निघतांना दोन्ही मुलांना राज देसाई मॅडम ने दिलेल्या शाळेच्या बॅग दिल्या . बॅग दिल्याबरोबर त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आले . कारण खूप दिवसांपासून त्या मुलाची बॅग फाटली होती आणि खूप ठिकाणी ती बॅग शिवली होती . बॅग कडे पाहिल्यावर आणि त्या माउली कडे पाहून मला ही रडू आले आणि समाधान देखील वाटले की आपण खऱ्या गरजू लोकांना मदत करत आहोत . धरती फौंडेशन तर्फे मिळणाऱ्या मदतीवरच ती माउली आज त्या दोन्ही नातवंडांना शिकवते आहे .”मॅडम तुम्ही आज मला देवासारख्या आहात ” असे उद्गार ऐकल्यावर आधी अनुभवलेला सर्व त्रास आणि थकवा गळून पडला .तिथून पुढे त्या मुलांच्या शाळेत गेलो ,दोन्ही मुले अतिशय हुशार आहेत असे सर्व शिक्षकांनी सांगितले .नवीन बॅग मिळाल्यावर दोन्ही मुले खूप खुश झाली .त्यांच्या चेहऱ्यावरील हसरे भाव मनात घेऊन पुन्हा मालेगाव ला यायला निघालो .मध्ये रस्त्यात जळकू गावातीळ एका मुलीला भेट दिली .तिथून पुढे वळवाडी आणि वीराणे येथील मुलांना भेटलो .तो ही रस्ता अतिशय खराब आणि बराच लांब होता .दोन्ही ठिकाणी शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला . वाळवाडी येथील गौरव पवार आणि वीराने येथील त्याच्याच २ बहिणी दीपाली आणि प्रतीक्षा पवार हे सर्व अभ्यासात चांगले आहेत .या सर्व प्रवासामुळे दुपारी जेवण्यास वेळ मिळाला नाही ,तसेच हि ठिकाणे इतकी दूर आणि ओसाड होती की जेवण्यासाठी हॉटेल देखील मिळाले नाही .त्यामुळे शेवटी एका झाडाखाली डॉ अनिल पवार यांनी आमच्यासाठी पार्सल आणले आणि साधारण ५ वाजता जेवलो . परतीला मी ड्राइव्हर कृष्णाला म्हटले कि आज माझ्यामुळे तुला खूप उशिरा जेवायला मिळाले ,तर त्यावर तो म्हणाला “आपल्याला वेळेवर जेवायला नाही मिळाले तर काय बिघडले पण त्या मुलांच्या आणि आज्जीच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला तो किती भारी होता ” या उत्तराने मी स्वतः निशब्द झाले आणि सुखावले.