Category "Uncategorized"

विद्यार्थी गुणगौरव सोहळा

August 17, 2019

आपले रोजचे आयुष्य जगताना आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार घेऊन नोव्हेंबर २०१६ मध्ये धरती फाऊंडेशनची स्थापना झाली.आत्महत्या ग्रस्त शेतकरी तसेच घरातील कर्ता पुरुषाचा अकस्मात मृत्यू यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्या मुलांना बालमजुरी करावी लागू नये यासाठी कार्य करण्याचे ठरवले.नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून अशी ५० मुले निवडली आणि दरमहा त्यांच्या बँक खात्यात ५०० रुपयांची मदत देण्यात आली.या चांगल्या कार्याला अनेक हितचिंतकांचा हातभार लागला. हळूहळू हे रोपटे वाढीस लागले आहे.दिनांक १८ऑगस्ट २०१९ रोजी कुसुमाग्रज येथे इयत्ता दहावीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेहसंमेलन सम्पन्न झाले.नाशिक जिल्यातील अतिशय दुर्गम भागातुन हे ८ विद्यार्थी कार्यक्रमाला अतिशय तत्परतेने आणि वेळेवर हजर होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाजसेवक मा.श्री.मुकुंद दीक्षित आणि त्यांच्या पत्नी वासंतीताई यांनी मुलांचे कोडकौतुक केले. श्री मुकुंद दीक्षित ह्यांनी १८ वर्षे आदरणीय बाबा आमटे आणि डॉ प्रकाश आमटे यांच्याबरोबर कार्य केले आहे. १९७६ साली हेमलकसा येधील लोक बिरादरी शाळेची स्थापना मुकुंद दीक्षित यांनीच केली. वासंतीताईंसह लाहिरी या गावात पंधरा वर्ष कॉटेज हॉस्पिटल च्या माध्यमातून आदिवासीं माडिया गोंडांसाठी आरोग्य सेवा दिली.मध्य प्रदेशातील झाबुआ या दरोडेखोरग्रस्त जिल्ह्यात दरोडेखोरांच्या पुनर्वसनासाठी दहा वर्ष कार्य केले. गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून हे दीक्षित दांपत़्य त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच आदिवासी गावात कार्य करीत आहेत.या व्यतिरिक्त मुकुंद दीक्षित आणि वासंती दीक्षित हे जीवनउत्सव, क. भाऊराव पाटील दत्तक पालक योजना, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन आदि संस्था संघटनांच्या बरोबर शहरी भागात काम करीत आहेत.अशा समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाने कार्यक्रमाची शोभा निश्चितच वाढली.शिक्षणाचा दर्जा आणि त्याहूनही माणसातली माणुसकी जागृत करण्याच्या त्यांच्या विचाराने सर्वच भारावून गेले.धरती फौंडेशनच्या परिवाराबरोबरच इतर सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने हा सोहळा थाटामाटात सम्पन्न झाला. हे कार्य असेच सातत्याने चालू ठेवण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.